मानसिकता

स्नेहल माळकर-फणसळकर
13 Feb 2018

A+  A-

 १

आम्ही उभयता एका हॉटेलमध्ये गेलो होतो. थोड्या वेळाने हॉटेलचे मालक, जे आमच्या चांगले परिचयाचे आहेत, आमच्याकडे आले. विचारपूस करुन झाल्यावर ते माझ्याकडे वळले.

.. “मॅडम, तुम्ही खूप छान लिहिता. परवा आलेला तुमचा लेख तर सुंदरच आणि अभ्यासपूर्ण होता. तुमची भाषाशैली पण उत्तम आहे.”

स्तुती ऐकून मी मनात जाम खूष झाले. जवळजवळ आकाशात उडायलाच लागले म्हणा ना!……. आणि तेवढ्यात त्यांचं पुढचं वाक्य मला एकदम जमिनीवरच घेऊन आलं !

..”तुम्ही एकट्या काय लिहिणार म्हणा — साहेब मदत करत असणार.”

मी अवाक झाले !

लगेच माझ्या नवऱ्यानं स्पष्ट केलं –

..”मी काही मदतबिदत करत नाही बरं का. बऱ्याचदा मी तर छापून आल्यावरच वाचतो.”

….आता हे नंतरचं बोलायलाच हवं होतं का?…..खरं आहे, मी लिहिलेलं तो स्वतःहून कधी वाचत नाही, बऱ्याचदा मीच त्याला ऐकवते. आणि पर्याय नसल्याने तो बिचारा ऐकतो.

…पण असो, किमान त्याने “आपण मदत करत नसल्याचे” सांगून मनाचा मोठेपणा तरी दाखवला होता. म्हटलं चला, आता तरी यांचा विश्वास बसेल, की मी स्वतःच सगळं लिहिते म्हणून.

मी अपेक्षेने त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून दचकलेच.

“हा तर साहेबांच्या मनाचा मोठेपणा आहे. मदत करतात पण कबूल करत नाहीत.” असा भाव चेहऱ्यावर आणून, “कसं ओळखलं बरोब्बर” अशा नजरेनं गृहस्थ आमच्याकडे पहात होते ! मला खरंतर धक्काच बसला होता. जी गोष्ट कधी माझ्या मनातसुद्धा आली नाही ती असणारच असं हा समोरचा माणूस एवढया ठामपणे कसा काय म्हणू शकतो? एखादी चांगली गोष्ट एकटी स्त्री, पुरुषाच्या मदतीशिवाय करु शकते यावर यांचा विश्वासच नाही.

काय कारण असावं अशा मानसिकतेचं….. असा विचार करु लागल्यावर लक्षात येतं की या गोष्टीला पुरुषच नव्हे तर बऱ्याच प्रमाणात आम्ही स्त्रियाच कारणीभूत आहोत !

काही काही गोष्टी ज्या आपण सहज करु शकतो त्या गोष्टींसाठीसुद्धा आपण पुरुषांवर अवलंबून राहातो आणि नकळतच अशा मानसिकतेला खतपाणी घालतो. साधा घरच्या गॅसचा सिलेंडर बदलण्यासारखी गोष्ट — जी एकदा समजून घेतली तर फारशी कठीण नाही आणि मुख्य म्हणजे स्वयंपाकघराशी निगडीत आहे. सिलेंडर कधीही संपू शकतो अशा वेळी पुरुष येण्याची वाट बघण्यापेक्षा आपला आपल्याला सिलेंडर बदलता आला तर? किती सोयीचं होईल ना ते ?

हे तर काहीच नाही. अगदीच क्षुल्लक गोष्टींसाठी पुरुषांवर अवलंबून असणाऱ्या बायका मी पाहिल्या आहेत. “दोन दिवस झाले मला अमुक वस्तू हवी आहे, पण यांना वेळच नाही”अशी तक्रार करत कामं खोळंबून ठेवणाऱ्या बायका असतात. पार्लरमध्ये जायलासुद्धा काही काही बायकांना नवरा लागतो ! … नाही म्हणजे नवराबायकोंनी एकमेकांवर अवलंबून असावं – त्यातही एक वेगळी गंमत असते – त्यातूनच एकमेकांवरचं प्रेम दिसतं, किंबहुना वाढतंसुद्धा ! पण ते अवलंबून असणं म्हणजे तुमची अगतिकता नव्हे. जसं कामाचं आहे तसंच काहीसं निर्णयप्रक्रियेचं आहे. अगदी क्षुल्लक निर्णय घेतानासुद्धा घरचे पुरुष काय म्हणतील याचा बाऊ केला जातो. तुमचा निर्णय योग्य असेल तर उगाचच कोणी कशाला विरोध करेल? आणि आपला निर्णय योग्य असेल तर समोरच्याला ते तसं आपल्याला पटवून देता आलं  पाहिजे, आणि वेळ आली तर आपल्या निर्णयावर आपल्याला ठाम रहाता आलं पाहिजे. मात्र यासाठी आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे.

या गोष्टीचा शिक्षणाशी काही संबंध नसतो – ती वृत्तीच आहे. काही सुशिक्षित बायका पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून असलेल्या दिसतात तर कधी एखादी अशिक्षित किंवा कमी शिकलेली स्त्री स्वकर्तृत्वावर संसाररथ चालवताना आढळते. कित्येक वेळा अशा बायका मुलांच्या हितासाठी घरच्यांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतात. तर काही सुशिक्षित स्त्रिया दडपणापोटी योग्य निर्णय घ्यायला कचरतात.

माझी एक मैत्रीण शिक्षिका आहे.  एकदा माझ्या औषध-दुकानात औषधं घ्यायला आली होती.  म्हणाली – “सगळी देऊ नको, गरजेची असतील तेवढीच दे”.

मी म्हटलं -“अगं, सगळीच गरजेची आहेत…आणि तुला काय प्रॉब्लेम आहे घ्यायला?”

तर म्हणते कशी – “अगं, दिसतं तसं नसतं. माझा सगळा पगार घरात नेऊन द्यावा लागतो मला”. मग मला ठराविक पैसे खर्चापुरते देतात. जादा लागले तर मागून घ्यावे लागतात. मीच कमावलेले पण मलाच देताना तोंडं वाकडी होतात. त्यापेक्षा न मागितलेलेच परवडतात.”

“काय सांगतेस?”…

मला तर चांगलाच धक्का बसला होता. मी म्हटलं -“अगं, कुठल्या जमान्यात रहातेस बाई? मला तर खरंच वाटत नाही. घरखर्चाला पैसे द्यायलाच हवेत. पण ते ‘तू’ दे ना. तू कमावतेस ना? मग त्याचा योग्य विनियोग पण तूच केला पाहिजेस.”

मी असं बोलायची खोटी; ती बांध फुटल्यासारखी बोलायला लागली. तिच्या घरात तिला “एक कमावून आणणारी” या पलीकडे काही स्थानच नव्हतं. स्वतः कमवत असूनही, एखादी गोष्ट खरेदी करण्याची तिची हिंमत नव्हती. हौसमौज तर दूरचीच गोष्ट! …..ती सारखी घरच्यांना दूषणं देत होती. मी मात्र तिलाच दोष दिला – “या गोष्टीची सवय तूच लावलीस ना? नव्यानवलाईच्या दिवसांत काही गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. पण आपल्यावर अन्याय होतोय हे जेव्हा तुझ्या लक्षात आलं, तेव्हाच तूच का नाही या गोष्टींना आळा घालायचा प्रयत्न केलास? मऊ लागलं की कोपरानं खणायचं हा निसर्ग नियमच आहे.” ……तिलाही माझं म्हणणं कळलं, पण वळलं की नाही कोण जाणे!

सगळ्यात महत्त्वाची आणि वाईट गोष्ट कुठली असेल तर ह्या सगळ्याला कारणीभूत आपण बायकाच असतो. सुनेच्या अशा मुस्कटदाबीला बऱ्याचदा सासू जबाबदार असते. काही ठिकाणी एखाद्या स्वभावानं गरीब असलेल्या सासूला सुनेचा जाच सहन करावा लागतो. थोडक्यात काय तर बाईच बाईच्या अधोगतीचं कारण बनते.

हल्ली बऱ्याच ठिकाणी परिस्थिती बदललेली आहे. सासवा-सुना, नणंदा-भावजया यांचं पारंपारिक शत्रुत्वाचं नातं मैत्रीकडे झुकू लागलंय. पण अजूनही हवा तसा आणि हव्या त्या प्रमाणात हा बदल झालेला नाही. एकीकडे आपण एकविसाव्या शतकाच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे स्त्रियांवरील अन्यायाची, अत्याचाराची बातमी नाही असा दिवस जात नाही. हे चित्र बदलायचं असेल तर आपण स्त्रियांनीच कणखर बनणं आवश्यक आहे. अजून किती वर्षं कुबड्या वागवत फिरायचं? प्रत्येकीनं किमान स्वतःमध्ये जरी परिवर्तन घडवून आणलं, तरी चित्र पालटायला वेळ लागणार नाही.



आज दुपारी घडलेला प्रसंग. मी भाजी घ्यायला नेहमीच्या दुकानात गेले. पाहिलं तर वातावरण थोडंसं तापलेलं होतं. दुकानदार दोन माणसांशी तावातावाने हुज्जत घालत होता. विषय अर्थातच ‘ग्रामपंचायत निवडणूक’ हाच होता. मी शांतपणे ऐकत होते. मी निवडणुकांच्या राजकारणापासून चार हात लांबच रहाते. या दुकानदाराच्या वहिनीने फॉर्म भरला होता, तोही या दुकानदाराला काहीही कल्पना न देता. त्यामुळेच खरं तर त्याचा ईगो दुखावला होता. पण तो सारखा एका गोष्टीचा उल्लेख करत होता….आणि नेमकी तीच गोष्ट मला खटकत होती. तो सारखा एकाच मुद्द्यावर जोर देत होता की – “ही विधवा बाई कोणत्या तोंडाने मत मागायला जाणार?”…..

मी यात पडायचं नाही असं ठरवलं होतं. ‘राजकारणाच्या गोष्टीत अजिबात पडू नकोस,’असं मी सारखं मनाला बजावत होते. पण विधवा असल्यामुळे तिने बाहेर पडायचं नाही, हे ऐकूनही न बोलता रहाणं जमेचना. अशावेळी गप्प बसणं म्हणजे अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणं.

मी म्हटलं – “झाली ना हो आता दोन वर्षे.”

त्यावर त्याचं म्हणणं – “म्हणून काय झालं, शेवटी विधवाच ना?”

मग मात्र रहावेनाच म्हणून शेवटी बोललेच. म्हटलं -” कदाचित तुम्हाला माझं बोलणं आवडणार नाही. पण तिनं विधवा आहे म्हणून निवडणूकीला उभं रहायचं नाही हे काही बरोबर नाही. बाकी तिने उभं रहाताना घरच्यांशी चर्चा करायला हवी होती, हा तुमचा मुद्दा बरोबर आहे.” त्याला कितपत पटलं कुणास ठाऊक … पण किमान मी माझं म्हणणं तरी मांडलं.

एखादी बाई विधवा होते हा तिचा गुन्हा आहे का? मग तिने गुन्हेगारासारखं तोंड लपवून का रहावं? एखाद्याची बायको मेली तर तोसुद्धा असाच तोंड लपवून रहाणार का? आणि मुख्य म्हणजे जेव्हा एखाद्या बाईचा नवरा मरतो तेव्हा तिने बाहेर पडायला नको म्हणून तिची आणि तिच्या मुलाबाळांची आर्थिक जबाबदारी तुम्ही उचलता का? तेव्हा मात्र तिने स्वतः कष्ट करुन मिळवावे अशी अपेक्षा असते. मग आताच विरोध का? सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे या दुकानदाराची बायको शेजारी उभी राहून त्याचीच री ओढत होती.

आपण फक्त शरीराने एकविसाव्या शतकात आहोत का? विचारांची जडणघडण इतकी मागासलेली कशी काय ? कधी शिकणार आपण माणसाशी माणूस म्हणून वागायला ? कधीतरी जातिभेदातून आणि स्त्रियांना कमी लेखण्याच्या या वैचारिक गुलामगिरीतून बाहेर पडणार आहोत की नाही ? निवडणुका आल्या की एकजात सर्वांना आपापली जात आठवते. प्रचाराच्यावेळी जातभाई असल्याचा उल्लेख आवर्जून केला जातो. इतर जातीच्या लोकांना मग शेजारधर्म, सलोख्याचे संबंध अशा गोड शब्दांत गुंडाळले जाते. एकही उमेदवार स्वकर्तृत्वावर जिंकायची जिद्द दाखवत नाही. आपण या साऱ्या भूलथापांना आणि आमिषांना बळी पडतो, आपला मेंदू गहाण टाकतो, आणि नंतर विकास होत नाही म्हणून गळे काढतो.

– स्नेहल माळकर-फणसळकर
माणगाव, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग 


Want to support our writers and read great content while you're at it?

Subscribe to our WhatsApp list and stay updated. We never send spam messages.

Subscribe on WhatsApp

Subscribe via email