कठीण कठीण कठीण किती, पुरुषहृदय बाई…

डॉ. मेधा फणसळकर
15 Mar 2018

A+  A-


“ चिपका लो मेरा फोटो – फेविकॉल से ”

टिव्ही वर गाणे चालू होते आणि चवळीसारखी करीना कपूर मटक मटक के नाच रही थी! मी हेव्याने टक लावून तिच्या नाचापेक्षा तिच्या झीरो फिगरकडे पहात होते. तेव्हढ्यात दारावरची बेल वाजली. दार उघडले तर दारात आमच्या नवरोजीचे परममित्र हजर झाले होते. माझ्या नावडत्या कुळांपैकी हे एक कूळ होते, पण नवऱ्याचे परम दैवत असल्याने मी बळेच हसून त्यांचे स्वागत केले.  “काय वैनी, काय चाललंय? अरे वा! करीना का? वैनी काय उत्तम प्रकृती आहे ना हिची? मनात आणलं तर तुम्ही सुद्धा अशी फिगर मिळवू शकाल हं …”

“हिची? शक्यच नाही ! काहीतरी सांगू नकोस.” सुट्टीच्या दिवसाची तीन तासाची वामकुक्षी (?) काढून आलेला नवरा हाताने “चहा कर” अशी खूण करीत म्हणाला. त्यावर मित्र म्हणाला, “चॅलेंज घेतोस? प्रत्यक्ष पुरावा आहे माझ्याकडे. हे बघ फोटो!” असे म्हणून त्याने एक अल्बम काढून दाखवायला सुरुवात केली. त्यात 20/25 जणांचे आधीचे ‛वजनदार’ आणि नंतर ‛हलके’ झालेले फोटो होते. ते बघून आमचे कुतूहल चाळवले. आमचे चेहरे बघून मित्राने पुढचा पत्ता टाकला. “हे बघा वैनी, माझ्याकडे ही दुधातून मिल्कशेक करुन घ्यायची पावडर व पाण्यात टाकायची पावडर आहे. ती एक महिना घेतलीत की तुमचे वजन तीन किलो कमी होईल.” मला एकदम जादूची कांडी सापडल्यासारखे झाले. मी म्हटले, “भावजी, काय सांगता? आम्हाला दोघांनाही द्या ना!” पण आमचे नवरोजी तसे धूर्त आणि दूरदर्शी असल्याने पट्कन म्हणाले, “थांब पक्या ! आपण आधी हिला सुरू करु या! तिचा रिझल्ट बघून मी पुढच्या महिन्यात सुरु करेन. तशीही माझ्यापेक्षा हिलाच त्याची जास्त गरज आहे.” ‘पाच हजाराचे’ महिन्याचे दुखणे मी विकत घेतले आणि माझ्यावरील अन्यायाचे दशावतार सुरू झाले.

माझ्या वजनावर टपून बसलेल्या माझ्या नवऱ्याच्या हातात माझ्या “झीरो फिगर” चे खणखणीत शस्त्र मिळाले. आपल्या सुटलेल्या ढेरीवर हात फिरवत म्हणतो कसा, “राणी, तुझ्या प्रकृतीपुढे पाच हजार रुपये फार नाहीत ग! एक महिना तरी (किमान) तू हे डाएट परफेक्ट कर. नक्की तू करीनासारखी होशील. मी तुला मदत करीन.” (या सगळ्याचा मतितार्थ असा की पाच हजार रुपये फुकट जाता कामा नयेत) दुसऱ्या दिवसापासून नवऱ्याच्या मदतीचे स्वरूप कळले आणि मी अक्षरशः पस्तावले.

सकाळी मस्त साखरझोपेत असताना कानाशी ओरड ऐकू आली, “उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा उठा चला ….. उठा ” सकाळी सकाळी कुणाला राष्ट्रप्रेमाचे भरते आले आहे असे मनाशी पुटपुटत मी कान गच्च बंद करुन घेऊन पांघरूण ओढून घेतले. तेव्हढ्यात नवरा गदा गदा हलवत म्हणाला, “अग ए उठतेस ना? आजपासून व्यायाम करायचा आहे ना आपल्याला! उठ लवकर ….. उठलीस का?” डाएटच्या आठवणीने ताडकन उठले व फिरायला जायची तयारी केली. बेडरूममध्ये येऊन बघते तर नवरोजी डोक्यावर पांघरूण घेऊन मस्त घोरत होते. उठवले तर म्हणतो कसा, “आजच्या दिवस एकटीच जा ना! रात्री जरा जागरण झाले ना? (म्हणजे टीव्हीवर भारत पाकिस्तान क्रिकेट सामना बघायचे बरे!) त्यामुळे डोळेच उघडत नाहीयेत. प्लिज, मी उद्यापासून येतो. पण तुला उठवायचे काम मी वेळेवर केले बर का!” अनुभवाने मला माहित होते की उद्याच काय, हा कधीच माझ्याबरोबर येणार नाही. त्यामुळे अशी अन्यायग्रस्त मी माझ्याच झीरो फिगर साठी फिरायला बाहेर पडले.

मस्त ग्राउंडवर फेऱ्या मारुन घरी आले व फक्कडसा चहा करुन घेतला. पहिला घोट घेणार तेव्हढ्यात आवाज आला, “अग हे काय करतेस? चहा कसला घेतेस? सकाळी दुधी भोपळ्याचा ज्युस घ्यायचा आहे ना? कालच मी आपल्या बागेच्या बाहेर दुधी- कार्ली वैगेरे ज्यूस विकणाऱ्या भय्याकडे एक ग्लास रतीब सुरु केला आहे. हे बघ my sweet करीना, तुझा ज्यूस हजर आहे. आण तो चहा इकडे !” असे म्हणून तो ग्लास माझ्या हातात देऊन नवरा कृतकृत्य नजरेने चहाचे घोट घेऊ लागला. मी मात्र माझ्यावरील हा अन्याय दुधीरसाच्या घोटाबरोबर गिळू लागले.

बरे झीरो फिगरबरोबर जरा मॉडर्न लूक यावा म्हणून त्या दिवशी मॉलमध्ये जाऊन नवीन फॅशनचे दोन – तीन टॉप घेऊन आले. संध्याकाळी पतीराज घरी येण्यापूर्वी  “सजना हैं मुझे सजना के लिये” वैगेरे म्हणत हलकासा मेकअप करुन सजनाची वाट बघत बसले. दार उघडल्यावर जरा मस्तपैकी लाजले (?) वगैरे. तर प्रतिक्रिया काय? “आज काय नाटकात बिटकात काम कारतीयेस का? झगामगा अन् माझ्याकडे बघा! आणि हे नवीन झबले कसले? शिंप्याला कापड कमी पडले की काय? अर्थात् हल्ली बायका अति सुदृढ झाल्याने तो तरी काय करणार बिच्चारा! लावली ठिगळं आणि केली न्यू फॅशन!” अस्सा राग आला होता म्हणून सांगू ! पण करणार काय?

आता आणखी एक मला पडलेला प्रश्न म्हणजे, “समस्त पुरुषवर्गाला आपल्या बायकोपेक्षा शेजारणीच्या पाककलेबद्दल नेहमीच आदर का असतो?” आमच्या पतीराजाना कायम शेजारणीने केलेली पावभाजी अगदी गाड्यावरच्या सारखी लागते; मात्र घरी केलेल्या पावभाजीत कधीच दम नसतो. एक दिवस अस्मादिकांनी युक्ती लढवली. घरी पावभाजी करुन शेजारी नेऊन ठेवली व पतीराज घरी आल्यावर तीच पावभाजी शेजारणीने केली म्हणून खाऊ घातली. पाची बोटे चाटत आस्वाद घेताना पतीदेवांना शब्द कमी पडत होते. मग खाऊन तृप्त झालेल्या नवऱ्याला हळूच रहस्य सांगितले. तर म्हणतो कसा, “तरीच! एकदा मला शंका आली होतीच. पण नेहमी रुळावरून जाणारी गाडी कधीतरी चुकून घसरते ना! तसेच झाले असावे असे वाटले. अर्थात् अजून झणझणीत झाली असती तर आणखी ‛मझा’ आला असता.” बघितलं ना आम्हा बायकांवर किती आणि कसा अन्याय होतो ते!

अहो, या अन्याय अत्याचाराच्या कित्ती कथा सांगाव्यात तितक्या कमी आहेत. सुट्टीच्या दिवशी यांना जरा भाजी आणायला पिटाळावे तर दुपारच्या जेवणानंतर साहेब दोन तीन मित्रांना घेऊन उगवणार! एखादी साडी- ड्रेस आवडला तर त्याऐवजी आपल्याला संसारोपयोगी चार वस्तू कशा घेता येतील हे शिताफीने पटवणार! आपण मात्र नवीन मॉडेलचा स्मार्टफोन दुसऱ्याच दिवशी खरेदी करून जुना सेलफोन आमच्या माथी मारणार! ऑफिसमधील सहकारी बायका, शेजारीणी यापेक्षा आपली बायको अगदी ‛काकूबाई’ आहे असा यांचा (आणि मुलांचासुद्धा) ठाम विश्वास आहे. आम्हाला ग्रहदशा वाटणारे याचे काही काही काका, मामा, मावश्या यांचे अत्यंत लाडके असतात. मग लाडक्या भाच्याचे कौतुक करायला आणि सुनेची गृहकृत्यदक्षता बघायला (म्हणजेच ती गृहकृत्यदक्ष कशी नाही आणि भाचा किती तिला मदत करतो हे बघायला) ते वारंवार घरी येतात व नम्रतेचा मुखवटा पांघरून आम्हाला त्यांचा पाहुणचार करावा लागतो. यांना स्वतःचे नातेवाईक आणि नाती धड आठवत नाहीत. (आम्ही मात्र नाती सासूबाईंकडून समजून घेऊन लक्षात ठेवायची.) परंतु एखाद्या समारंभात भेटणाऱ्या एखाद्या काकांना मामा समजून हे पोटभर गप्पा झोडतात व आमचा मामा करतात. सासुरवाडीला इतके नम्र व लीन असतात की आमचे आई- वडील मुलीचे भाग्य बघून सद्गतीत होतात. लग्न लागताना “नाती चरामि! ” असे म्हणून तो बायकोच्या गळ्यात माळ घालतोच, पण त्याबरोबरच मनातल्या मनात आपले आई – वडील, मुले- बाळे यांचीही जबाबदारी तिच्यावर टाकून अक्षरशः मोकळा होतो आणि त्या व्रतापासून अजिबात ढळत नाही.

म्हणून समस्त स्त्रीवाचकवर्गाला माझे असे आवाहन आहे की आपल्याही घरी असे नवऱ्याकडून अन्याय होत असतील तर आपण आमच्या या म. न. वि. से.( मनमानी नवरेशाही विरोधी सेना ) या संघटनेत सामील व्हावे. सध्या या संघटनेची संस्थापक, अध्यक्ष, कार्यवाह व सदस्य ही सर्व पदे अस्मादिकच सांभाळीत आहोत. परंतु आम्हास विश्वास आहे की “थेंबे थेंबे तळे साचे” या न्यायाने आपण आमच्यात सामील व्हाल व ही चळवळ पुढे न्याल. हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या अशा छोट्या छोट्या समस्यांवर काम करणाऱ्या बऱ्याच संघटना आहेत; परंतु आमची संघटना एकमेवाद्वितीय आहे. तरी कृपया सहकार्य करावे ही विनंती! जय स्त्रीशक्ती !

तळटीप :

(प्रस्तुत लेख हा काल्पनिक असून काही प्रसंगांशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. लेखिकेच्या घरी खात्री करुन घेण्यास संपर्क करु नये, भ्रमनिरास होईल.)

डॉ. मेधा फणसळकर

डॉ.मेधा फणसळकर.
मु. पो. माणगाव
ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

View all posts


Want to support our writers and read great content while you're at it?

Subscribe to our WhatsApp list and stay updated. We never send spam messages.

Subscribe on WhatsApp

Subscribe via email