चेरी

डॉ. प्रज्ञा रोटीथोर
17 Feb 2018

A+  A-

कुत्रे पाळण्याचा कोणताही पूर्वानुभव गाठीशी नाही. याबाबतीत पाटी कोरीच. शी-शू साठी माझी मदत होणार नाही हे मी स्पष्ट कबूल करून घेतलेले. तरीही ५ डिसेंबरला जन्मलेले ते इवलेसे काळेभोर पिल्लू आमच्याकडे आले ! … आणि “लॅब्रॅडॉर” नावाची कुत्र्यांची ब्रीड असते हा शोध मला त्या दिवशी लागला !

तीन आठवड्यांच्या त्या पिल्लाला सांभाळण्याच्या बाबतीत आम्ही पहिलटकरीणच होतो. तिला दूध पाजले ते पचले नाही. टेलिफोनच्या खोक्याचे घर बनवले ते रुचले नाही. औषध ती घेईना, दहा मिनिटांच्यावर सलग झोपेना….. कितीही आवडली असली तरी आमचे स्वतःचे हॉस्पिटल सांभाळून तिच्याकडे कसे लक्ष ठेवायचे… हा मोठाच प्रश्न उभा राहिला. आमच्या एकुलत्या एका मुलाला  – अमोलला वाढवतानासुद्धा इतक्या तडजोडी केल्या नसतील !!!! पण अद्याप नामकरण न झालेल्या त्या काळुंद्रीने इतका जीव लावला होता की घरच्या कामवाल्या बाईंसकट आम्ही ड्यूटी वाटून घेऊ लागलो.

पुण्याहून मेसेज करून, अमोलने तिचे बारसे केले – “चेरी”.

ती आता आम्हाला ओळखू लागली, भराभर मोठी होऊ लागली, घराबाहेरची छोटीशी पायरी गडगडत उतरू लागली. ती पहिल्यांदा भुंकली ती ब्रेकिंग न्यूज लगोलग अमोलला कळवली गेली.

चेरीला जेव्हा जास्तच पाय फुटले तेव्हा आम्ही घरात, अंगणात जागोजागी जाळ्या आणि दारे बसवली. कारण आम्ही तिला कधीच बांधून नाही ठेवले – ना कधी पिंजऱ्यात कोंडले. ती कायमच आमच्या कुटुंबाचा घटक म्हणून राहिली. तिनेही आम्हाला अगदी भरभरून प्रेम दिले.

चेरीचे स्वतंत्र गादी-उशीवर झोपणे, कारमध्ये ऐटीत पुढच्या सीटवर बसणे (मी मागच्या सीटवर !), आमचे तिच्यासाठी मासे आणणे (आम्ही स्वतः खात नसूनही), हॉस्पिटलमधून रात्री यायला कितीही उशीर झाला तरी तिला फिरवून आणणे – या सर्व गोष्टी आमचे शेजारीपाजारी आणि इतर डॉक्टर मंडळी थोड्या चेष्टेने, बरेचसे कौतुकाने चर्चीत. चेरीसुद्धा सुख लावून घेणारी होती – परिकथेतील राजकन्येचे बालपण उपभोगत होती.

चारेक महिन्यांची असताना एक आक्रितच घडले. रात्री घरी आलो तर चेरी गायब. कामवाल्या बाई नेहमीसारख्या सातच्या सुमारास अंगणात सोडून घर बंद करून निघून जात. आम्ही येईपर्यंत ती अंगणातच मोकळी असे. दोन-दोन कुंपणे ओलांडून ती जाणे अशक्यच. म्हणजे चक्क कोणीतरी तिला पळवूनच नेले होते. शोध घ्यायचा तरी कसा आणि कुठे ? आजूबाजूचा सारा परिसर पालथा घातला. बाईंच्या घरीही जाऊन विचारले. पोलिसात तक्रार द्यायची तरी खूण काय सांगणार – काळीकुट्ट इतकेच वर्णन ! आणि गळ्यात लाल पट्टा – बस्स !…… हतबुद्ध झालो. अमोलला काय कळवायचे ?

दोघेजण हताश होऊन बसलो होतो. ज्योतिष जाणणाऱ्या मैत्रिणीला फोन केला !!!….. इतक्यात गेटपाशी हलकेच भुंकण्याचा आवाज आला – बघतोय तर आमचीच सुकन्या – धापा टाकीत, तहानलेली, खूप दमलेली !

…कशी आली ? कुठपासून आली, कोणी नेली होती ? आणि तिने घर शोधलं तरी कसं ? ते गूढ कधी उकललंच नाही….

तशी ती आळशीच होती. तिला खेळायला आणलेल्या चेंडूकडे तिने ढुंकूनसुद्धा पाहिले नाही. आणि खादाड म्हणजे एक नंबर !! सकाळी फ्रीज उघडला की आता दूध आणि अंडे मिळणार हे लगेच कळे, आणि गरम पोळीचा वास तर तिच्या तेज नाकात असा काय शिरायचा की तिचा टॅक्स चुकवल्याशिवाय डब्यात पोळ्या साठणे अशक्यच !! रात्रीचे आम्हां तिघांचे एकत्र फिरणे हा तिच्या दिनक्रमातला खास आनंदाचा क्षण असे. मी नक्की येतेय की नाही यावर डोळा ठेवत तिची आतबाहेर घालमेल सुरु राही. मग बाहेर पडलो की जाताजाता दारातल्या झाडाचे एखादे पान उगीचच कुरतडणार. खूप लांबचा कारचा प्रवास तिला झेपत नसे, पण जवळच अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या आमच्या शेतावरची सफर तिच्या खास आवडीची. खिडकीतून तोंड बाहेर काढून छान वारा खात ऐटीत बसलेल्या चेरीकडे रस्त्यातले लोक अगदी कौतुकाने पाहायचे. आणखी एक गंमत म्हणजे आम्ही आणि आमचे शेजारी दोघांनी स्विफ्ट गाडी एकदमच घेतली, पण तिला दोन्ही गाड्यांपैकी आमची गाडी वेगळी बरोब्बर कळे. तिला घड्याळ समजते यावर आमच्या बाईंचा ठाम विश्वास होता ! त्यांच्या मते रात्रीचे नऊ वाजले की ती बरोब्बर दारात येऊन बसे आमची वाट बघायला.

पुढे जाड झाल्याने तिला पुढची सीट पुरेना. खरं तर खाणे आणि फिरणे यातील व्यस्त होत गेलेले प्रमाण आमच्या आधी लक्षातच आले नाही. तिच्या, जेमतेम पाचेक वर्षे होताच झालेल्या, अकाली मृत्यूचा झटका पचवणे आमच्या कुटुंबाला फारच जड गेले. अवघ्या पाच वर्षांत तिने असीम आनंद दिला होता. तिला रामनवमीच्या दिवशी झालेली नऊ पिल्ले – (बाळंतपण मी स्वतःच घरीच केले होते) – त्यांना पूर्ण दीड महिना नीट सांभाळून मगच ब्रीडरकडे सोपवले होते.

चेरीची चतुराई, भोळसट पण प्रेमळ नजर, साऱ्या घरावर मालकीहक्क गाजवण्यातला तिचा रुबाब — डोळ्यांसमोर अगदी लख्ख आहे अजून !

……..तिला मुका प्राणी म्हणणे आजही माझ्या जिवावरच येते.

प्राणी नाही – ती तर आमची राणीच !

– डॉ. प्रज्ञा रोटीथोर,
** पुणे


Want to support our writers and read great content while you're at it?

Subscribe to our WhatsApp list and stay updated. We never send spam messages.

Subscribe on WhatsApp

Subscribe via email